आठवणीतील माणसं ; बाबुराव घाडगे

*आठवणीतील माणसं : बाबुराव सखाराम घाडगे*

समोरच्या घरात सुरु असलेल्या सुखकर्ता दु:खहर्ता या आरतीने... ती घंटी हेलकावे घेत अशी साथ द्यायची की सकाळी सकाळी जाग यायची. माझ्या समोरच्या घरात एक देवभोळा माणूस राहात होता. सामान्य माणसांपेक्षा सामान्य माणूस,साधी राहणी. किडकिडीत बांधा, गोरा वर्ण, सदरा लेंगा घालणारा... गळ्यात भलीमोठी तुळशी माळ म्हणजे त्यांची सोन्याहून मौल्यवान असलेली संपत्ती. साधारणत: ५० च्या दशकात सातारा येथील कराड जवळील उंब्रज येथून मुंबई मध्ये दाखल झालेला हा युवक म्हणजे *घाडगेबुवा उर्फ  बाबुराव सखाराम घाडगे*. 

सौ तानुबाई आणि श्री नारायण जाधव यांच्या आश्रयाखाली त्यांनी कार्यास सुरुवात केली. या उभयातानी देखील आपल्या पूत्रासारखे त्यांच्यावर प्रेम केले. त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सामील होऊन आपलाच पुत्र असल्याचे अभिमानाने सांगितले. अनेक ठिकाणी कामे केल्यानंतर रे रोडच्या पन्नालाल मिल मध्ये सेवा प्रारंभ सुरु झाला. क म्हणजे काय... क हा शब्द जणू कष्टासाठी निर्माण झाला आहे म्हणून त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. समाजाची सेवा करताना त्यांना धन अर्पण करता आले नाही. परंतु त्यांचे तन मन मात्र सातत्याने खर्ची घातले. कौटुंबिक अडचणी आल्या. ज्येष्ठ चिरंजीवाच्या अपघाताने मात्र थोडे दिवस ते हेलावले होते. परंतु त्यावर देखील मात करीत आपल्या संसाराला फुलविले. आयुष्यभर श्रमलक्ष्मीची आराधना केली. श्रम मेहनत चिकाटी आणि प्रामाणिकपणा या गोष्टीची कास कधी सोडली नाही.त्यात ते कधी कमी पडले नाहीत.
या माणसांविषयी लिहिताना अनेक प्रसंग मी स्वत; डोळ्यांनी पाहिलेले, बाबु गेनू नगरात एक छोटेसे मैदान होते. आजही आहे असे समजू. तेथे सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा खेळ आणि बैठका होत होत्या. तेथे एक देवलशी बाबा आणला गेला होता. बाबा आले म्हणून तोबा गर्दी झाली. बाबापुढे गाऱ्हाणे घालताना मांडी घालून न बसता डावीकडे पाय सोडून आपले बसायचे आणि आपल्या इच्छेप्रमाणे मांडीखाली पैसे टाकायचे. तेव्हा चार आण्याचा जमाना होता. त्या चार आण्यात बाडावाला बिल्डींगच्या बाहेरील राष्ट्रीय क्षुधा शांतीभवन मध्ये पोटभर जेवायला मिळत होते.काय अजब तऱ्हा... ! बघितले या महाशयांनी आणि तेथल्या तेथेच बाबाला अशी लाखोली वाहून असे पळविले कि बाबा कधी पुन्हा परतला नाही.
नगरसेवक श्री. पडवळ यांना कामाला लावणारा माणूस म्हणजे बाबुराव घाडगे. त्याकाळी नगरसेवकांची डोकेदु:खी म्हणजे महापालिका गटारव्यवस्था. साधारणत:रात्री  ८ ते ९ च्या सुमारास वाहू लागायची. मग हे महाशय श्री पडवळ यांच्याकडे जायचे. त्यांच्याकानावर कथन करायचे मग रात्रीच्यावेळी बाबुला टँक येथून विशेष कुमक घेऊन रात्री २ ते ३ वाजेपर्यंत हे महाशय ती गटारे स्वच्छ करून घेत असत. हे सतत घडत असे. आम्ही पाहत असायचो. किती तळमळ असायची. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असणारा हा माणूस. कोणत्या पक्षाचा अनुयायी नव्हते पण कोणीही असो त्याच्यापुढे आपली बाजू बेधडक मांडणारा माणूस म्हणून प्रचलित होते. त्यांना पाहून भले भले कधी कधी आपला रस्ता बदलत असत. सतत ते लोकप्रश्नावर कैफियत मांडत असत. अशा माणसांच्या आठवणीत कधी रमलो तर आज अशी माणसं का दिसत नाहीत. नवरात्र उत्सवात धडाडीने भाग घेणारा, श्री कापरेश्वर उत्सवात ज्याची अती लगबग दिसत असे, असा माणूस कोणत्या पदाविना घोडपदेव प्रभागाची सेवा करीत होता.
एक किस्सा सांगायचा झाला तर  घाडगेबुवा निस्सीम कापरेश्वरभक्त.. दररोज सकाळी घरातून तांब्याभर पाणी घेऊन पूजा करायला मंदिरात जात असत. तासभर पूजा सुरु असायची. एक दिवस यांचा तांब्याच कोणी तरी चोरून नेला. रुसले हे देवावर...! माझ्या भक्तीला अर्थ उरला नाही म्हणून त्यांनी पूजा करण्याचे सोडून दिले. जो पर्यंत माझा तांब्या परत मिळत नाही, तोपर्यंत मी पूजा करणार नाही. जवळजवळ तीन महिने गड्याने पूजा केली नाही. एके दिवशी मंदिरात कोणी तरी तांब्या विसरून गेले तो तांब्या दोन तीन दिवस असाच पडला असताना काहींच्या मनात संकल्पना रुजली, घाडगेबुवांचा तांब्या परत मंदिरात आला.  झाले, घाडगे बुवा पुन्हा भक्तिमय झाले.
असा हा गोड माणूस जीवनाच्या अखेरच्या वाटेवर मात्र असताना त्या बाबु गेनू नगरच्या चिंचोळ्या गल्लीत बसून सुहास्य वदनाने आमची विचारपूस करी तेव्हा मात्र काळीज भरून येत असे. फुलवात तेवत होती तोवर ती प्रकाशमान होऊन पाहत होती,अखेर वारा आला अन अखेर त्यांनी आपला जीवन प्रवास योगिनी एकादशीच्या दिवशीआपल्या उंब्रज गावी  दिनांक २० जून २०१७ रोजी संपविला. एक श्रमजीवी सेवक कृष्णेच्या पात्रात विलीन झाला.


*अशोक भेके*
*घोडपदेव समुह

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट