जनार्दन कोंडे मानपत्र
ASHOK BHEKE
मानपत्र
आदरणीय श्री जनार्दन पूनाजी कोंडे (नाना) यांस
सविनय नमस्कार
आज आपल्या आयुष्यातील सुवर्णाक्षरानी लिहून ठेवावा असा दिवस. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अशा शब्दात वर्णन करण्याजोगा आपला अमृत महोत्सव वाढदिवस. आमच्या सर्वच संस्थांच्या आणि हितचिंतक मित्रांच्या वतीने आपले या शुभदिनी वाढदिवस अभिष्टचिंतन.
छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत शिवनेरीच्या पायथ्याशी जन्मभूमीतून शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबई सारख्या कर्मभूमीत अर्थात घोडपदेव मधील हुतात्मा बाबू गेनू नगरातील चाळीत वास्तव्य करीत आपण आपलं आयुष्य समाजासाठी दिलंत. मुंबई अग्निशमन दल आणि निरलॉन सारख्या संस्थामध्ये दिलेली सेवा उल्लेखनीय आहे. अगदी साधं आयुष्य जगत आहात. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण स्वाभिमान, आत्मसन्मानाचा कधी बळी दिला नाही. आयुष्य जगताना व्यवहार कधी पाहिला नाहीत. तो आपला जमलाही नाही. रंजल्या- गांजलेल्याना मदत केलीत. सहज संवादातून चौकटीबाहेरचं अंतरंग उलगडवित घरगुती वादळाला काबूत आणण्याची कला ही केवळ तुम्हीच जाणे. आपण काय कमविलं आणि काय गमविलं याचा हिशोब कधी ठेवला नाही. जे गमविले त्याची खंतही कधी केली नाहीत. बळ आल्यावर प्रत्येक पाखराने आभाळात जरूर झेप घ्यावी पण ज्या घरट्याने ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. आजही एकत्रित कौटुंबिक पध्दतीचा वसा आजही पाळत आपण ओंजळ भरून आनंद देत आहात, हे आजच्या युगात अभिमानास्पद आहे. ही आनंद देणारी ओंजळ सर्वांच्या घरोदारी असावी. समाजाप्रती, कुटुंबाप्रती असलेला आपला ऋणानुबंध जिव्हाळ्याने जपत आहात. आपलं हे कार्य असंच अखंडपणे चालू राहो आणि आपली आनंदी, विपुल अनुभवाने भरलेली ओंजळ समृद्धतेनं कायम भरलेलीच राहो. घर्षण केल्याशिवाय रत्न उजाळत नाही, त्याप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य सिध्दीस जात नाही, या आपल्या मंत्राचे अवलोकन करण्यासारखे आहे.
आपल्या सारख्या सामाजिक शिस्तप्रिय कार्यकर्त्याचे प्रेरणादायी कार्य पुढील पिढ्यांना कायम स्मरणात राहील. हे सारे करीत असताना आकाशा एवढ्या तुकोबांच्या मागे सावलीसारखी उभी राहिलेल्या माता आवली प्रमाणे सौ विठानानी आपल्या सारख्या निर्मळ आणि कर्तुत्ववान आदर्शव्रत कार्यकर्त्याला जपत सातत्याने आपणास बळ देण्याचे काम केले.
आपणास आणि आपल्या सहचारिणी सौ विठानानी यांस आई भवानी निरोगी दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना करीत हे मानपत्र आम्ही आपणास अत्यंत नम्रपणे अर्पण करीत आहोत.
हुतात्मा बाबू गेनु नगर सेवा मंडळ
सर्व रहिवासी आणि हितचिंतक
फाईव्ह स्टार स्पोर्ट्स क्लब
हुतात्मा बाबू गेनु गणेशोत्सव मंडळ
घोडपदेव समूह

टिप्पण्या