आठवणीतील माणसं : बोरकरदादा


        घोडपदेव हे नाव तसं ऐकायला विचित्रच. या परिसराला हे नांव कसं पडलं असावं .... आपल्या मनात हा प्रश्न नेहमीच घोंगावत असेल. साधारणत: विसाव्या शतकात जयगड (वरवडे) येथून स्थलांतरीत आबा बोरकरांनी या परिसरात बस्तान बसविल्यानंतर देव घोड्यावर बसून येत आहे असे स्वप्नी दिसे . त्या अगोदर खडकात सापडलेल्या मूर्तीला खडकदेव म्हटले जात होते. पण देव घोड्यावर बसून येत आहे यावरून आबा बोरकरानी स्वप्नातल्या देवाला  “घोडपदेव “’ म्हटले अन घोडपदेव परिसराचे नामकरण असे झाले.
बोरकर दादा म्हणजे मुंबईतील बडं प्रस्थ . कॉंग्रेसच्या राजकारणातील बाहुबली. वचक इतका होता की, विरोधकांना आपली पाळेमुळे रोवता आली नाहीत. बोरकर दादांच्या प्रभाव क्षेत्रात साधी सभा देखील घेता आली नाही. केवळ घोडपदेवचे नव्हे तर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यामुळे घोडपदेव नाव दुमदुमलेले असे. बोरकरदादांचा अनुभव आचार्य अत्रेंना देखील आला. त्यांनी तर मराठा मधून बोरकरदादांवर जहरी अग्रलेख लिहिल्याचे जुनी मंडळी सांगतात त्यामुळे बोरकर दादांविषयी ‘ यावश्चंद्र दिवाकरो ‘ .....  जो पर्यंत सूर्य चंद्र आकाशात तळपत आहेत, तो पर्यंत  “घोडपदेव आणि बोरकरदादा’ इतिहास विसरणार नाही.
                तरुणाईतील उर्जा विधायक पद्धतीने बाहेर काढावी ह्या हेतूने बोरकर दादा सतत प्रयत्न करीत असत. विभागीय संस्था, मंडळे आणि व्यायाम शाळांची निर्मिती करून संघटन केले. माणसं जोडली गेली. उपक्रम राबविले.
        बोरकरदादांचा गोविंदा गोविंदा सुप्रसिध्द होता. नारळी प्रौर्णिमेच्या रात्री निघणारा गोविंदा धाक्कू माक्कूम..... धाक्कू माक्कूम करीत गल्ली बोळातून गोविंदा रे  गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा करीत निघे तेव्हा बोरकर दादांचा गोविंदा आला म्हणून समस्त आबाल-वृध्द कौतुकाने बघत असत.

आठवण एक अशी आहे की, लोकनायक जयप्रकाश नारायण यांची भव्य शोभायात्रा डायमंड बिल्डींग (आता रामभाऊ भोगले मार्ग ) येथून  चालली असताना बोरकरदादांनी शोभायात्रा अडविली होती. दगडफेक झाली लोकनायक सहकारी पळून गेले पण जयप्रकाश मात्र जागचे हलले नव्हते. बरेच काही घडले. केवळ जयप्रकाश नारायणच नव्हे  किती तरी आहेत की , त्यांची पळताभुई झाली. असे आमचे केशव ल. बोरकर उर्फ आबासाहेब .........

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट