ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलविण्याबाबत


प्रति,
सन्मा. श्री रमाकांत रहाटे सर
नगरसेवक,
मुंबई महानगरपालिका
यांसी सविनय सस्नेह जय महाराष्ट्र

विषय : ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलविण्याबाबत
महोदय,

कालच घोडपदेव ज्येष्ठ नागरिक संघाची एकदिवशीय सहल अत्यंत आनंदात पार पडली. गत तीन वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी सहल काढून थोडा विरंगुळा आणण्याचा प्रयत्न केला जातो.
सहल आपल्या आयुष्यातील बदल घडविते. सहल झाली की मन फ्रेश होते आणि माणूस दुप्पट उत्साहाने कामाला लागतो .या ज्येष्ठ मंडळीसोबत जाण्याचा योग आम्हाला देखील आला. त्यांच्यासोबत सहल अनुभव म्हणजे.... केवळ अविस्मरणीय अशी सहल.
घोडपदेव विभागात उतरत्या वयातही तितक्याच उत्साहाने विविध गोष्टींत समरसून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. समवयीन मित्रांसोबत रंगणारे गप्पांचे फड या उत्साहात भर घालतात, नवे बळ देतात. ज्येष्ठ नागरिक कट्टे याच उद्देशाने आकाराला येतात. येथे जमणारी अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळी या संघामधून दिवसभराचा उत्साह साठवतात.
काहीजण निवृत्त कर्मचारी तर अनेकजण घरगुती व्यावसायिक असतात. कुटुंबाला थोडा हातभार लागावा व आपला अनुभव मुलांच्या कामी यावा, याकरिता ते व्यवसायातही मदत करतात. उतरत्या आयुष्यात स्वावलंबी आणि आरोग्यदायी जीवन जगण्याचा प्रयत्न हे प्रत्येकाचे ध्येय. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना संपत्ती, पैसा यापेक्षा आपले कुणीतरी काळजी घेणारे असावे, असे वाटते. परंतु तेही त्यांना मिळत नाही. अशांमध्येही सकारात्मकता रुजवण्याचे काम जर कोणी करीत असेल तर ते  घोडपदेव ज्येष्ठ नागरिक संघ करत आहे.
या संघात प्रत्येक जण एकमेकांच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी असतात. या शिवाय स्वत:चे आयुष्य जगत असताना दुसऱ्यांनाही मदतीचा हात पुढे करत गरजू व गरीबांनाही वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यातही या ज्येष्ठ नागरिकांचा नेहमीच पुढाकार असतो. निवृत्तीनंतर आयुष्याच्या संध्याकाळी थोडा आराम, काही काळ विरंगुळा आणि मनासारखे जगात यावे, अशी काहीशी या ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा असते. नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. पण सातत्याने बदलत जणारे नवनवे तंत्रज्ञान हे त्यांना पूर्णत: उमजत नाही. कारण त्यांना कार्यालय नाही. ते साधे बैठे खेळाचे आनंद घेण्यापासून वंचित आहेत. सांज सकाळ त्यांना हक्काने तेथे बसण्यासाठी स्थान नाही. अन्य विभागात मात्र तशी परिस्थिती कोठे दिसून येत नाही. आपली त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची तीव्र इच्छा आहे. हे आपल्या सहली दरम्यान आलेल्या फोन वरून कळले आहे. आपण घोडपदेव ज्येष्ठ नागरिक संघासाठी खेळाचे साहित्य देण्यासाठी प्रयत्नशील आहात. परंतु ते साहित्य ठेवण्यासाठी आणि खेळण्यासाठी कार्यालय देखील देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवा, ही विनंती घोडपदेव समूहाच्या वतीने करीत आहोत.

*अशोक भेके*
*घोडपदेव समूह*


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट