फेसबूक वरचं प्रेम...

परवा आमच्या गणोबाचे लग्न जुळल्याची बातमी उडत उडत आमच्यापर्यन्त पोहचली. बरेच दिवस ताटकळला होता. बातमी ऐकून आनंद वाटला. लग्न जुळत नाही म्हणून मध्यंतरी त्याने अविवाहित तरुणांची बैठक बोलाविली होती. मुली मिळत नाहीत म्हणून बैठकीत गणोबाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण त्याच्या मित्राने त्याच्या मनसुब्यावर पाणी ओतले होते. निराश गणोबाच्या नशिबात नियतीने मुंडवळया बांधल्या नसाव्यात, असा समज करून घेतला होता. नियती ज्या प्रमाणे एखाद्याचे आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याच प्रमाणे कोणाच्या येण्याने ते पूर्ण होणार किंवा नाही हे नियतीला पूर्णत: ठाऊक असते.

गणोबा आमचा जवळचा खास माणूस. माणूस यासाठी की तो आता तरुण राहिला नव्हता. चंचल स्वभावाचा आणि गोड प्रसन्न सदानकदा. फार फार गरीब,  हे तो सांगायचा. आम्ही फक्त ऐकायचो. त्याच्याकडे जे जे होते ते काकणभर देखील आमच्याकडे नव्हते. तरी स्वत:ला गरीब म्हणून घेण्यात धन्य मानी. गरीबीचे कारण सांगताना आम्ही इतके गरीब आहोत की, आम्ही पोहे खातो त्यात शेंगदाणे नसतात. इतके आम्ही गरीब आहोत. शेंगदाणे नसतात मग काय असते रे... त्याला उत्सुकतेने विचारले.

काही नाही रे... आई त्यात काजू बदाम टाकते ना.... हे ऐकून कपाळावर नक्कीच हात जाईल.

असा गणोबा फेसबुक सारखे माणसा माणसांना जोडणार्‍या माध्यमावर कार्यरत होता. अधून मधून त्याच्या पोष्ट बघायला मिळत होत्या. फेसबुकवर स्वतःचे विचार अगदी मोकळे पणाने मांडता येतात.  संदेशाची देवाण घेवाण होत असते. एके दिवशी फेसबुक वर गणोबाने ठाण मांडल्यावर त्याच्या जाळ्यात एक पाखरू हाय हॅलो करीत चालून आलो. याने प्रतिसाद दिला आणि येथेच कथानक सुरू झाले. कोमेजलेला चेहरा आनंदित झाला. गडी बेहद्द खुश झाला. संदेशाची देवाण घेवाण सुरू झाली. प्रेमाची ज्योत अंत:रंगात पेटली अन प्रेमचा दीप प्रकाशमान झाला. गणोबाला सापडलेली गंगी खूप हुशार होती. गणोबा पूरता तिचा झाला होता. गंगीचा प्रोफाइल फोटो पाहून साठीचा देखील पागल होईल असे तिचे रुपडे होते. चॅटिंग सुरू झाले पण गुड नाइट करायला गणोबाला रात्रीचे दोन तीन वाजू लागले. अल्पावधीतच ती प्रिय वाटू लागली होती. तिचे सौंदर्य खरंच फोटो प्रमाणे असेल का ? असा प्रश्न गणोबाला पडत होता. पण हे गणोबा ताडत बसला नाही. प्रेम हे आकाशाइतकं उत्तुंग आणि विशाल असतं. शिवाय आंधळ असते. तिला प्रत्यक्षात न पाहता तिच्या मनात घुसला होता. केवळ चॅटिंगमुळे त्याचं प्रेम जुळलं होतं. गंगी अधून मधून मोबाइल रिचार्ज, गूगल पे वर रक्कम मागून घेत होती. गरीब गणोबा खर्चात पडला होता. तिचा खर्च करताना तिला कधी गरीब असल्याचा बहाणा केला नव्हता. वडील सरकारी नोकरीत तर आई खाजगी कंपनीत कामाला आहेत, हे तिला सांगितले होते. त्यामुळे गंगीला पैशाचे झाड हाताला लागल्याचा आनंद होता.

गणोबाला वाटलं चॅटिंग खूप झाले. आता मूळ मुद्याला हात घालावा म्हणून थेट प्रपोज करुन टाकले. गंगी आढेवेढे घेईल असे वाटले होते. पण तिने दुजोरा दिला. त्या खुषीतच गड्याने लग्न जुळल्याची आनंदवार्ता सर्वांना सांगून टाकली. गणोबा आणि गंगी प्रत्यक्षात भेटण्याचे ठरले. एका महागड्या हॉटेलात गंगी गणोबा भेटले. फोटोतली गंगी तरुणपणाचा फोटो टाकलेली होती. आता ती बर्‍यापैकी प्रौढ झाली होती. पण ताटकळलेल्या गणोबाला तीचे वर्तमान सौंदर्य मान्य होते. भेटी सुरू झाल्या. गणोबाच्या खिश्याला कात्री लागू लागली. गंगी रोकड देखील अधून मधून प्रवासाला म्हणून मागून घेत होती. एकेदिवशी हॉटेलात दोघे बसलेले असताना गंगीचा दूसरा बॉयफ्रेंड तेथे आला आणि गंगीला गणोबाच्या बाजूला चिकटून बसलेले पाहून अचंबित झाला. गंगीने त्याला देखील असे लुटले होते. कंगाल केले होते. रागाच्या भरात गंगीला अद्वातद्वा काय काय बोलला. घाणेरडे शब्द गणोबाच्या कानावर आदळले. निशब्द झाला होता. एकच बॉयफ्रेंड नव्हे तर गंगीने अनेकांना गिर्हाइक केले होते. गंगीचे अनेक प्रताप उघडकीस आल्यावर गणोबाची चोरपावलांनी सुरू झालेली प्रेमाची ओंजळ भरण्यापूर्वीच रिती झाली होती. बाधित प्रेमाचे बंध मातीत मिसळले होते. स्वप्नाचा चुराडा झाला होता. डोळ्यात अश्रुची गर्दी झाली होती. त्याने वेड्यासारखं प्रेम केले होते. लग्नानंतर त्या सुंदर क्षणाचा आनंद लुटण्यासाठी आतूरला होता. त्याच्या स्वप्नाचा झूला झोकाळे घेता घेता अचानक थबकला होता. प्रेमभंगाने तुटलेल्या हृदयाला सावरता येत नव्हते. समजूत घालणारे कोणी नव्हते. हुंदके वाढले होते. हळव्या मनातून आसवं टपकू लागली होती. धाय मोकलून रडला.

फेसबूकवर गंगी देखील आहे आणि गणोबा सारखे आहेत. किंबहुना अदलाबादल करा. काही ठिकाणी मुली देखील फसल्या जातात. काही मुली मुलांच्या नावात तर मुले मुलींच्या नावात वावरताहेत. सोशल मीडियाच्या माध्यंमावर धुमाकूळ घालीत आहेत. महिलांच्या मेसेज बॉक्स मध्ये घुसू पाहत आहेत. त्यांच्या जाळ्यात कोणी ना कोणी अडकण्याची शक्यता असते. कदाचित आपल्यातला कोणी गणोबा असाच वेडा झालाही असेल. गंगी असो वा कोणी गंगाराम अशा विकृती अश्लील शब्दांतर्गत लगट करीत असतील तर त्यांना अद्दल घडवा. गणोबाने आता निश्चय केला आहे की, एकच कट आयुष्याचा, पुन्हा नाही ओलांडायचा सागर तो प्रेमाचा...

अशोक भेके

घोडपेव समूह

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट