असाही एक महाभाग : धोंडू पावटे

 

            

*असाही एक महाभाग : धोंडू पावटे*

            आजच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात नुसती उठाठेव करणारे महाभाग आले आहेत. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायला चावडीवरचे सदासर्वदा तयार असतात. रानगवा कोथरूड मध्ये  आला तर त्याचा गवगवा अधिक प्रमाणात करणारे शहाणे अधिक मासात निपजले आहेत की काय, हा प्रश्न मनात येतो. काही माणसं मुळात नकारार्थी का असतात, हा कोडं न उलगडणारा प्रश्न. चांगले असो वा वाईट... त्या माणसाने नकाराची घंटा बडवावी, हा त्याचा धर्म काही केल्या सुटत नाही. असाच आमचा एक मित्र आहे. धोंडू पावटे नावाचा. बोलण्यात जितका साधेपणा आणि सुलभतातरुण, सडपातळ आणि चष्मिष्ट- अगदीच अंगावर मांस न चढलेला अर्थात प्रभावहीन व्यक्तिरेखेतला, लालपिवळे दात अर्थात घोड्यासारखे खिदळताना दिसणारे कपिलदेवच्या पामोलीनच्या जाहिरातीची कुचेष्टा करणारे आणि त्यातून खळाळणारे ते कानाला सहन न होणारे हास्य.. भाषा म्हणजे... अगदी झणझणीत चारशब्द कसेबसे गोड बोलले की, मधुमेह होईल या भीतीने चारशब्दामागे तिखटमिरचीच्या पुणेरी ठेचा प्रमाणे एखादी शिवी हासडताना मनातल्या असंतोषाला अलगद वाट करून देताना धोंड्या कमालीचा वस्ताद. जे खुपतं त्याबद्दल त्यांची स्वच्छ भूमिका ते निर्भयपणे हा त्यांचा स्वभावधर्म. या वैशिष्ट्यावर संतूअण्णा वगळता अनेकजण फिदा.

            अशा या मित्राच्या उशिरा का होईना जुळून आलेल्या लग्नाला गेलो असताना हॉल सजला होता. धोंड्या शेवटपर्यंत उभा राहील का..? आली समीप घटिका म्हणताच पळून जाणार नाही ना...! *संतूअण्णा* अनपेक्षित बाउन्सरपुढे बावळटपणे हसून वेळ मारून इतकं आपल्या हातात होतं. एखाद्या नवीन औषधाने घरातली झुरळे धारातीर्थी पडल्यावर जो आनंद लाबाहतो त्यानुसार संतूअण्णा  मात्र खळखळून हसला.  स्वत:च्या विनोदावर समोरचे निष्प्रभ झालेले पाहिले की, एक असुरी आनंद होतो. संतूअण्णाच्या जिभेवर काळा तीळ असल्याचे धोंड्यानेच सांगितले होते. संतूअण्णा चे वर्णन एका गोष्टीचे आवर्जून करावे ते म्हणजे त्यांचा सुहास्य चेहरा. नासिकापूडी आणि वदन कक्ष यामधील जागेवर चांदीचे लेपण केलेली मिशी.. डोक्यावर वाढलेला केशसंभार म्हणजे जंगलच. जंगलात ऊ चा चंचुप्रवेश देखील होणार नाही. डोळ्यावर काचेचा चष्मा... संतूअण्णा सूत्राकडून वदविलेल्या या भाष्याला धोंड्यांनी नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून संतूअण्णाला तोंडघशी पाडले. मंगलाष्टके सुरु झाली. सर्वजन धोंड्याकडे लक्ष ठेऊन होते. शुभमंगल सावधान झाले अन अक्षता पडल्या. वाजंत्री गलबला सुरु झाला. धोंड्याचे चार हात झाल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडत टाळ्यांचा गजर केला. संतूअण्णा च्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित आले. धोंड्याच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ निर्माण करणाऱ्या प्रसंगाचे आम्ही साक्षीदार झालो.

                        धोंड्या आमचा चावडीमित्र.बाप गिरणीत कामाला होता. रपाटे घालून घालून धोंड्याला शाळा शिकवायचा प्रयत्न केला पण बाप असफल झाला. कमी पुस्तके शिकलेला पण जबरदस्त हजरजबाबी, पारंगत  म्हणावा असा. प्रत्येक बाबतीत मतभेद हा त्याच्या पाचवीला पुजलेला जणू काही... कंबर कसून येतो आणि रानगव्याच्या मृत्यूवर कसलाही न्यूनगंड न बाळगता मत व्यक्त करून सरकारचे आणि स्थानिक प्रशासनाचे वाभाडे काढीत असतो. विरोधी पक्षात जसे सत्ताधारी कितीही प्रकल्प लोकहिताचे राबवीत असले तरी विरोधी आपला हेका सोडत नाही. धोंड्याने चावडीवर विरीधी नेत्याची भूमिका वठवावी, असे निरर्थक गुण त्याच्या अंगी होते. धोंड्याची शिस्त, त्याचा आग्रही किंवा क्वचित हेकट स्वभाव हे बऱ्याच जणांना आवडत नसतील याची त्याला देखील कल्पना होती. पण सर्वानी आपल्याला चांगलं म्हणावं असा त्यांचा आग्रहदेखील नव्हता. कुणी वाईट म्हणेल म्हणून त्यांनी आपली जीवनशैली बदलली नाही. कधी कुणाच्या आयुष्यात हस्तक्षेप  केला नाही कि स्वतःच्या आयुष्यात तो खपवून घेतला नाही. 

                        अहो, धोंडूशेठ रानगवा जंगलातून शहरात आला होता आणि धुमाकूळ घालीत होता....! अडथळा शर्यतीत नेहमी भाग घेणाऱ्या संतूअण्णा यांनी लगाम घालायचा प्रयत्न केला. पण माघार घेईल तो पावट्या कसला...! प्रश्नावर प्रश्न करून जंगलातल्या जागा तुम्ही बळकावल्या म्हणून ते शहरात आले बरं का....! धोंडू नशीब कामाला म्युनशीपालटीत असल्याने (पण तो काम करीत असलेल्या खात्याचा उल्लेख कधी करू नये म्हणून मला अट घातलेला माझा मित्र ) त्याच्या पदराशी अनुभवाच्या गाठी भरलेल्या असायच्या. विषय कोणताही असो, धोंडू पावट्याने तो विषय छेडू नये, असे कधीच झाले नाही. अशा हुशार माणसाचा श्रीफळ आणि महावस्त्र देऊन सत्कार करावा, पण संतूअण्णाचा विरोध नेहमीचाच. खरंतर अशा विद्वतापूर्ण माणसाचा सत्कार करायला आमची ना नव्हती. पण सत्कार करताना याला जोड्याने मारायला पाहिजे हि भावना संतूअण्णाच्या मनात घोळत होती. म्हणजे इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा त्यांचा सत्कार सोहळा नक्कीच होईल. कारण धोंडू पावट्याची गट्टी विविध क्षेत्रातल्या ताई माई आणि भाईशी...! मुळात धोंडू याला तयार नव्हता. माझा कसला सत्कार करताय....! बिनपावत्यांची वर्गणी काढाल आणि घश्यात घालाल...! खोचक पण आतापर्यंत अनेक सत्कारांच्या प्रसंगी अनेक जणांनी असा ताव मारल्याने चपखलपणे बिनधास्त आपल्या सत्काराची नकारघंटा वाजवून टाकली.

             *बायानो नवरे सांभाळा*  या नाटकाला धोंडू नाटक सुरु झाल्यावर अंधारात आला आणि संपायच्या अगोदर निघून गेला. कसलं नाटक....!  बायांना नवरे सांभाळण्याचा सल्ला देणारे हे मिजासदार कोण रे...? उठायचं सुटायचं आणि पुरुषवर्गावर ताशेरे ओढायच्या या प्रवृत्तीला सनदशीर मार्गाने मज्जाव केला पाहिजे.... धोडू पावटे निदान आठ दिवस ह्याच विषयावर बोलत होते. दादा कोंडके यांच्या ह्योच नवरा पाहिजे सिनेमा आला तेव्हा देखील पावट्याने अर्धी चड्डी आणि लोंबकळनाऱ्या नाडीवर तासाभराचे व्याख्यान झोडले होते. धोंड्याच्या तोंडून अमुक माणसाने चांगले काम केले आहे,असे कधी ऐकले नाही. अख्ख्या बटाट्याच्या गोणीत एक नासका बटाटा आढळतो तो म्हणजे धोंड्या पावटे सारखा....! कुणाला चांगले कधी लेखायचे नाही, आपलेच घोडे दामटायचे... अशा आमच्या या धोंड्याला एकेदिवशी भल्या पहाटे स्वप्न पडले. त्याला एका संस्थेवर त्याची निवड झाली आहे. फुलांचे गुच्छ घेऊन ताई माई भाई घरात उभे आहेत. स्वारी सकाळी सकाळी आमच्या निद्रेचा भंग करण्यासाठी आली. धोंड्याचे येणे म्हणजे काहीतरी रहस्यमय नक्कीच असणार म्हणून अंगावरची गोधडी झटकन बाजूला करीत धोंड्यासमोर आलो. ऐकून हसावं ते तरी कसं... पोटं दाबून किती वेळ राहायचे. मग धोंड्याची कशीबशी समजूत काढून त्याला विदा केले. चुरगळलेल्या स्वप्नांसारखा धोंड्या त्याचे व्यक्तिगत भावबंध उलगडताना विचारांचा महापूर वाहू लागला आणि  डोळ्यांच्या कडा ओलावून त्याला जाताना पाठमोऱ्या भागाकडे पाहतच उभा राहिलो. असा एक मित्र...

*अशोक भेके*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट