घोडपदेव चा सेलिब्रिटी : किशोर वायकर

 

घोडपदेव चा सेलिब्रिटी : किशोर वायकर

 

                        एखाद्या माणसांशी आपले सबंध जुळावेत किंवा एखाद्याशी जुळू नयेत, याला आमच्याकडे काही उत्तर नाही. अनेक माणसं असतात, भेटी पडतात. पडत असतात. पंधरावीस वर्षाची ओळख होते. परंतु भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. काही माणसं क्षणभरात आपलीशी होतात. सूर जुळतात. जन्मजन्मातरीचे नाते असल्यागत वाटू लागतात. येथे भाषा धर्म आवडनिवड काही आड येत नाही. सुत जमून जाते. असाच एक आमचा किशोर वायकर....! का कोण जाणें आमचा कधी झाला कळले सुध्दा नाही. आमचा म्हणणे चुकीचे ठरेल. ग ची बाधा झाल्यागत वाटेल. पण आम्ही त्यांचे झालो हे म्हणताना, आम्हाला आजतरी धन्य वाटते. एखाद्याशी जिव्हाळ्याचे नाते जोडले की, ते उलगडून दाखविताना त्या व्यक्तीविषयी दोन शब्द अलगद कागदावर उतरतात. वाजवीपेक्षा अधिक कौतुक नाही, परंतु दोन शब्द प्रेमाचे गुण गाईन आवडीने...  लिहिल्याने माणसं जोडली जातात, असं म्हणतात. पण समस्त लेखकांना मात्र कटू याचे अनुभव कटू येतात. हि त्यांची शोकांतिका आहे.

                        किशोर वायकर स्वर्गवासी हरिश्चंद्र वायकर यांचे कनिष्ठ चिरंजीव. कष्टाळू माणसाचा कष्टाळू मुलगा. सोन्याच्या थाळीतून नव्हे तर लख्ख पिवळ्याधमक पितळीतून दूधभात खाल्लेला माणूस. बऱ्यापैकी उंची, भाग्याचे कपाळ सदासर्वदा झाकलेले काळेभोर केस आणि कंठी सोनसाखळी शोभे गोरीगोमटी काया, उठावदार कपडे... तरुण मनाला भुरळ पडावी असे बहारदार व्यक्तिमत्व. प्रेमळ आणि विनम्र स्वभाव, स्वच्छ व्यवहार,याच बहारदार व्यक्तिमत्वाला भुलली पेटीवालाची सुस्वभावी सोनम राजकन्या. प्रीती परि तुजवरती म्हणत दोन जिंव एकमेकांमध्ये विसर्जित झाले अर्थात जवळीक झाली, ब्रम्ही सुखावले. त्यातून नेत्ररुद्र ( नेत्रा आणि रुद्र ) सुगंध फुलून आला. व्यवसायाने प्रथम ते छायाचित्रकार त्यानंतर त्यांचे इतर व्यवसाय. दृष्टी अतिशय स्वच्छ अर्थात बुद्धिमान निरीक्षण. रोज काहीतरी पाहायचं असतं, शोधायचं असतं, अनुभवायाचं असतं, त्यातून जे मनाला पटेल असं टिपायचं हा छायाचित्रकाराचा साजेसा धर्म पाळणारा किशोर वायकर. नुसतीच छायाचित्र टिपणारे बहुत असतात पण भाव टिपून भावनिक बंध निर्माण करणारी फोटोग्राफी करताना बोलका फोटो काढणारा छायाचित्रकार म्हणून त्याचा गौरव करणे उचित आहे.

                        सवड काढून कट्ट्यावरच्या गप्पा कधीतरी सहभागी होताना अंबिकाच्या वाफाळलेल्या चहाचे रम व्हिस्की सारखे घोट घेताना न हसणाऱ्याला देखील चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटविणारे जबरदस्त विनोद व उत्तमोत्तम भंकस करताना विडंबनातून सुसंस्कृत आणि सभ्यपणाचे बुरखे घालून, स्व:घोषित कर्तेपण मिरविणाऱ्या मंडळींचे चिमटे त्यांच्या तोंडावर काढताना कुठलाही गदारोळ न करता अशी मेजवानी मिळणे, म्हणजे संथ संथ मैफलीत रंग भरवित हास्याची कारंजी उडविल्यागत धमालमस्ती अनुभवायला किशोर वायकर आणि त्या मंडळींचा कट्टा कुणाचीही थट्टा न करता काही क्षण आनंदित करून जाताना मोकळेपणाने वागायला तरुणात शिकलो, त्यामुळे पाचखळ विनोद, शाब्दिक कोट्या लेखनाला बहर आणू लागल्या. मला या कट्यावरच्या तरुणाईची चिंता वाटून घेण्यात मन तयार नाही. साहसाची आवड, काहीसा बेशिस्तपणा असेल तर हि तारुण्याची लक्षणे मानतो. त्यांनी थोडाफार दंगा केला तर यौवनमय अपराधत्वे  असं म्हणून आम्ही दुर्लक्ष करीत असतो. द्रव्यलोभ न करता कष्टाच्या कमाईला महत्व देणारी तरुणाई.... समाजहितासाठी स्वत:ला झोकून देणारी तरुणाई या कट्ट्यावर पहावयास मिळते. किशोर वायकर यांना किम्या म्हणून सर्वत्र संबोधतात. खरंतर किमया या शब्दाचा किम्या झाला असावा. ज्याच्या अनेक किमया आहेत त्याला संक्षिप्त रुपात किम्या म्हणून बोलले जाते. बे दुणे तीन किंवा पांच करणारे बहुत असतील पण बे दुणे चारची प्रामाणिकपणे किमया साधणारे आणि मातापित्याच्या सेवेचा धर्म पाळणारे किम्या सारखे दाद मिळवून जातात. 

                        कोणत्याही माणसाबद्दल माझ्या मनात अनादर नाही. केवळ त्यांच्या प्रवृत्तीवर हल्ला चढविणारे आपण लेखन करताना शीर्षक साजेसे मिळत नाही. तेव्हा मन सैरावैरा विचार करीत असते. असे अनेकवेळा होते, बहुतांशी लोक केवळ शीर्षक पाहून वाचतात. याची कल्पना आहे. कधी कधी मला या किशोर आणि कट्ट्याची आठवण येते आणि मला साजेसे शीर्षक मिळून जाते. त्याच्या शाब्दिक कोट्या म्हणजे चेष्टा मला शीर्षक देऊन जातात.

                        वाढदिवस हा आयुष्यातला महत्वाचा दिवस. काहीना मोठं झाल्याचा आनंद तर काहीना एक वर्ष कमी झाल्याची निराशा. आयुष्याच्या वाटेवर कुठेतरी अपार परिश्रम घ्यावे लागतात, तेव्हा कुठे आपण स्थिरस्थावर होतो. जे वरची श्रेणी प्राप्त करतात त्यांचा वाढदिवस हा घरापुरता मर्यादित न राहता समाजासाठी होतो. समाजाच्या वेदना ज्यांना होतात त्यांचा शरीराचा एक कोपरा सतत दु:खत असतो. ते जाणवून न देता समाजाप्रती प्रेम करीत त्यादिवशी आपल्या कमाईतला काहीसा हिस्सा विभागातील बालकमंडळीवर खर्च करून साजरा होणारा किशोरचा वाढदिवस अगदी जवळून पाहत आलो आहे. दिल्याने पुन्हा पुन्हा मिळते या थोरामोठ्यांच्या विचाराने प्रेरित होऊन इतरांबरोबर स्पर्धा न करता ‘सारेजण आनंदाने जगू’ अर्थात या ध्येयाशी समर्पित होऊन वाढदिवसाचा आनंद घेताना सुखाची अपेक्षा साहजिक होणार. त्यात किशोरला ईश्वर खूप काही देईल. खात्री आहे. प्रामाणिक माणसांच्या पाठीशी सदासर्वदा ईश आहे.

 

अशोक भेके

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट